Thursday, June 03, 2010

कोकणमेवा

परवाच गोनीदांचं ‘शितू’ वाचत होतो.. त्यातले कोकणाचे रम्य वर्णन वाचता-वाचता माझा मीच भूतकाळात शिरत होतो.. कॅमेऱ्याच्या फ्रेम सारखी आठवणींच्या ढिगाऱ्यातली अस्पष्ट, अंधुक चित्रे माझ्या डोळ्यासमोर येत होती..

शाळेत असताना प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीत माझा व आईचा बेत ठरलेला असायचा.. मे महिन्यामधील सोयीचे १५-२० दिवस हेरायचे आणि मामा-मावशीकडे कोकणात तेवढे दिवस नुसता मजेत आराम करायचा.. पुण्यासारख्या शहरी वातावरणात बाकीचे पूर्ण वर्ष घालवता-घालवता माझ्या मनोरंजनाच्या जागा, करमणुकीची कल्पना, खेळ, गमती-जमती हे सर्व माझ्या कोकणातल्या भावंडांपेक्षा खूपच वेगळे झाले होते..

म्हणूनच की काय कुणास ठाउक, पण मी वर्षातले ते १५-२० दिवस अगदी वेगळ्या विश्वात असायचो.. तिथल्या छोट्या-छोट्या गोष्टींचे मला फार नवल आणि कौतुकही वाटायचे.. शहराकडल्या अनेक गोष्टी नसतानाही आपापल्या ठिकाणी इथली घरे कशी स्वयंपूर्ण असायची.. लाल मातीच्या चि-यांचे गडगे, त्यावरुन कधी-मधी उड्या टाकताना आमची ढोपरं ब-याचदा फुटायची. पडवीतून शेजारच्या रस्त्याने मागच्या दारी गेले की न्हाणीघर लागायचे. त्याजवळील चुलीवर सकाळी एक भलेमोठे तपेले तापत असायचे. वर्षानुवर्षे पाणी तापवून ते काळे-कुळकुळीत झालेले असायचे. त्याशेजारी ब-याचदा आयांचे आपल्या कच्च्या-बच्च्यांना आंघोळ घालणे चालू असायचे . आंघोळीचे पाणी जायलाही अगदी नैसर्गिक उतार असायचा..घरामागे नेहमी फणस सोलणे किंवा आमसुले वाळवणे वगैरे चालू असायचे..जर अधेमधे मांजर व्याली असेल तर ती व तिच्या पिल्लांसाठी कोनाड्यात एक टोपली असायची ज्यात एखाद्या जुन्या साडीचा तुकडा घालून त्यांच्यासाठी अगदी मऊशार गादीसमान पृष्ठभाग तयार केलेला असायचा.. नवीन झालेली पिल्ले म्हणजे पोरा-टोरांपासून अगदी आजीपर्यंत सगळ्यांचा कौतुकाचा विषय असे.. मागे वाडीत गेले, की एक छोटासा आड, त्यातील पाणी मोटरने बाहेर येऊन लगेच चिऱ्याच्या पन्हाळयांमधून खालच्या माडांपर्यंत जायचे. माड संपले की मधे थोडी रेती , थोडी झाडे, आणि मग समुद्रच..

नुसते घर आणि परसच नव्हे, तर इथल्या रीती, सण, पूर्ण विश्वच वेगळे होते.. माझ्या भावंडांबरोबर भटकताना मला गावातल्या अनेक गोष्टी कळायच्या..होळीच्या वेळी इथे लोक (अगदी मोठे लोक ही ) कसे नाचतात, मागच्या वर्षी होळीच्या वेळी त्या गुरवाने भांग पिऊन कसा गोंधळ घातला होता.. गावदेवीच्या जत्रेत कोणाच्या अंगात देवी येते.. पावसाळ्यात शंकराच्या मंदिराबाहेरील बावीवर पोहायला कशी मजा येते, भोपळी बांधून पोहताना कुणाची कशी भंबेरी उडाली होती..गावच्या एका बाजूला असलेल्या पाताळेश्वराच्या मंदिरात लोक अंधाऱ्या रात्री जायला कसे घाबरतात, मागच्या वर्षी ज्येष्ठात कलमांच्या बाजूला बिबळ्याने कुळवाड्यास कसे धरले होते.. एक ना दोन..

जसा जसा मोठा होत गेलो तसे या ना त्या कारणाने कोकणात जाणे दुर्लभ होऊ लागले.. शेवटचा जेव्हा मी मागच्या वर्षी कोकणात गेलो होतो, तेव्हा भावंडांबरोबर फिरताना माझ्या मनात सतत येत होते, की सध्या मी exactly "लहान" व "मोठा" च्या हद्दीवर आहे .. यानंतर जेव्हा केव्हा येईन तेव्हा "लहान" नक्की नसणार.. म्हणून मी आपले माझ्या लहान भावंडांबरोबर "डबडा-इस्पैस" खेळून घेतले..ना जाणो, परत कधी यायला मिळेल किंवा नाही, काहीच माहित नाही..अगदी मी गेलो जरी, तरी "डबडा-इस्पैस" खेळायच्या वयाचा नक्की नसणार.. मनातून बालपण संपत असल्याचे दुःख होत होते .. पण काय करणार..मी आपली सगळी मजा एकदाची शेवटची अनुभवून घेतली..

आणि आज, "शितू" मुळे पुन्हा ते सर्व डोळ्यात उभे राहिले..या कोकणमेव्याची चव काही तोंडातून जायला तयार नाही...