Friday, July 24, 2015

अमेरिका - एक प्रवासवर्णन …अमेरिकेत आल्यापासून अनेक वर्षे ऐकत आलो होतो, की या देशाचा पसारा खूप अफाट आहे… पहिल्या काही वर्षातल्या देशांतर्गत प्रवासामुळे तशी थोडी कल्पना होतीच. पण स्वतः रस्त्याने हा देश पादाक्रांत  करण्याचा दुर्मिळ अनुभव घ्यायची संधी काही दिवसांपूर्वीच ईशिता व मला मिळाली. त्याचेच हे प्रवासवर्णन…

PhD नंतरच्या ह्या स्थलांतरासाठी  ईशान्येत असलेल्या न्यूयॉर्क राज्यातील इथाका मधून कॅलिफोर्नियात फोल्सम येथे जाण्याचा आमचा प्रवासाचा मार्ग काहीसा या नकाशाप्रमाणे होता :

या नकाशाबरोबरच आमच्या प्रवासातील काही आकडे बघून अमेरिकेच्या अफाट पसाऱ्याचा अंदाज येईल: एकूण प्रवासाचे अंतर : ३४२६ मैल (~ ५५०० कि. मी.)! १३ राज्यातून प्रवास. आम्ही हा प्रवास ८ दिवसात पुरा केला. त्यात २ दिवस स्थलदर्शन ही होते.

अमेरिका देशाची १७७६ साली जेव्हा स्थापना झाली, तेव्हा (सध्याच्या) पूर्व व ईशान्य अमेरिकेतील १३ राज्यंच अमेरिकेत होती. पुढच्या सुमारे ७५ वर्षात अमेरिकेने बाकीचा भूप्रदेश संपादित केला. ह्या इतिहासाचा एक परिणाम असा की पूर्व व ईशान्य अमेरिका सोडता बाकीचा संपूर्ण देश अतिशय विरळ वस्ती असलेला आहे.  कारण देशाच्या या भागांमधे खूप उशिरा स्थलांतर झाले. शिवाय जे American Indian लोक इथे हजारो वर्षे राहत होते, त्यापैकी बहुतांश लोक मारले गेले.  या विरळ वस्तीची जाणीव प्रकर्षाने होते हा प्रदेश रस्त्याने ओलांडूनच… अमेरिकेत अनेक लोक असा प्रवास करतात. तो मुख्यत: शक्य होतो तो अमेरिकेतील अतिशय उत्तम महामार्गांमुळे. या रस्त्यांवरील वेगमर्यादा ताशी ६५ ते ८० मैल (१०० ते १३० कि. मी ) असल्याने एवढी प्रचंड अंतरे मर्यादित वेळेत कापली जातात. अर्थात या उत्तम महामार्ग व्यवस्थेचा तोटा म्हणजे इथे public transport चा अजिबात विकास झाला नाही. त्यामानाने भारताने स्वातंत्र्यानंतर फक्त ६०-७० वर्षात रेल्वे व बसमार्गाचे जाळे देशाच्या अगदी कोपऱ्या-कोपऱ्यापर्यंत पोहोचवले आहे.

प्रवासाचे ढोबळमानाने नियोजन करून आम्ही इथाकाहून माझ्या सर्व सामानासकट (विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर घेऊन) प्रयाण केले.

पहिला दिवस: 


प्रवास सुरु होण्याआधी लक्षात आले की आपल्या गाडीचा A.C. योग्य पद्धतीने काम करत नाही. उन्हाळ्यातल्या या प्रवासामध्ये सुरुवातीला पूर्वेमध्ये तर जास्त तापमान अपेक्षित नव्हते, पण जसे जसे पश्चिमेकडे जाऊ, तसे तापमान खूप वाढणार त्यामुळे त्याची भीती होती. पण आम्ही तसेच निघायचे ठरविले. पहिल्या दिवशी इथाका ते शिकागो असा प्रवास होता. या मार्गात Pennsylavnia, Ohio, Indiana आणि Illinois या राज्यातून प्रवास होता. जवळ जवळ १००० किमी पेक्षाही जास्त अंतर! सकाळी ८ ला निघून वाटेत नाश्ता, जेवणासाठी breaks घेत घेत, Cleveland वगैरे शहरं ओलांडत रात्री जवळजवळ ९ च्या आसपास आम्ही शिकागो शहरात पोचलो. दिवसभर बराच वेळ पाउस होता. या प्रवासात New York व Pennsylvania सोडले की आपण अमेरिकेच्या तथाकथित Midwest मध्ये प्रवेश करतो.

हा भाग भौगोलिक दृष्टीने ईशान्य अमेरिकेहून वेगळा व अतिशय सपाट आहे. पुढची अनेक राज्यं मोठे डोंगर नावाला देखील दिसत नाहीत, फक्त मैलोनमैल शेती!

अजून एक नवीन अनुभव म्हणजे time-zones रस्त्याने ओलांडणे. एरवी विमान प्रवासानंतर घड्याळ पुढे-मागे करायची सवय होती, पण रस्त्याने जाताना घड्याळ adjust करायची वेळ अजून आली नव्हती. त्याचा एक परिणाम असा की आम्ही पश्चिमेला जात असल्याने जेव्हा जेव्हा time-zones ओलांडले, त्या दिवशी प्रवासासाठी एक तास जास्त मिळाला :) शिकागोत रात्रीचे जेवण वगैरे करून विश्रांती घेतली.

दुसरा  दिवस: 

शिकागो शहर व मिशिगन सरोवर 
दुसरा दिवस शिकागो शहर भ्रमंतीचासाठी होता. १८३७ मध्ये वसलेले शिकागो शहर औद्योगिक व आर्थिक दृष्टीने महत्त्वाचे आहे.  स्वामी विवेकानंदांच्या धर्मापरिषदेचे हेच ते शहर. अमेरिका व कॅनडा देशांमधे  असलेल्या ५ विशाल सरोवरांपैकी मिशिगन सरोवराकाठी  शिकागो आहे. ह्या शहरातील अनेक स्थळांना भेटी देत, शिकागो नदीतून शहरातील इमारतींचे दर्शन घेत आम्ही दिवस घालवला. शिकागोच्या इतिहासाबद्दलही थोडी माहिती मिळाली. १८७१ लागलेली शहरात लागलेली प्रचंड आग, शहराच्या पाणी-पुरवठ्यासाठी शिकागो नदीचा प्रवाह बदलून उलटा करण्याचे काम या सर्वांबद्दल कळले. शिकागो शहर windy city म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचे कारण जवळच असलेले विशाल सरोवर व उंच इमारतींमधून वाऱ्याला मिळणारी एकसंध दिशा. न्यूयॉर्क नंतर १९ व्या शतकात शिकागोच अमेरिकेतील महत्त्वपूर्ण शहर म्हणून उदयाला आले. शहरातून फिरण्याबरोबरच आम्ही इथल्या प्रसिद्ध Shedd Aquarium मधेही गेलो. तिथे अगणित प्रकारचे सुंदर मासे, डॉल्फिन्स, शार्क्स व इतर जलचर बघायला मिळाले. तिसरा  दिवस:

तिसऱ्या दिवशी शिकागोहून निघून Illinois, Wisconsin, Minnesota ही राज्यं पार करून South Dakota राज्यातील Sioux Falls येथे मुक्काम होता. आजचे ही अंतर जवळजवळ ९५० कि.मी. होते.  Wisconsin, Minnesota ही राज्यंदेखील अमेरिकेच्या "grand Midwest" चा भाग आहेत. Wisconsin राज्य America's dairyland म्हणून प्रसिद्ध आहे. इथे दूध व दुधाचे पदार्थ यांचे प्रचंड उत्पादन होते. तर Minnesota राज्य तिथे असलेल्या हजारो लहान-मोठ्या सरोवरांसाठी नावाजलेले आहे. Wisconsin मध्ये जेवण करून आम्ही पुढे निघालो. वाटेत मिसिसिपी नदीही ओलांडली, जी पूर्वीच्या अमेरिकेची सीमा होती.

आजचे मुक्कामाचे शहर Sioux Falls हे South Dakota राज्यात होते. हे राज्य पूर्वीच्या Native American जातीजमातींसाठी प्रसिद्ध आहे. मुळात राज्याचे नावच Dakota व Lakota या जमातींवरून आले आहे. शिवाय Sioux हे सुद्धा एका जमातीचेच नाव आहे. पूर्वीच्या European वसाहतींनी जेव्हा आपला पसारा वाढवला, तेव्हा अनेक Native American लोकांची कत्तल झाली. जे वाचले, मूळ समाजप्रवाहात (काहीसे) सामावले गेले, त्यांच्या समूहाला संरक्षित क्षेत्रं ("Indian reservations") मिळाली. अशा अनेक reservations ने भरलेले हे राज्य.  Wisconsin, Minnesota ही राज्यं पार करून शेवटी आम्ही South Dakota च्या Sioux Falls मध्ये मुक्कामाला पोहोचलो. 


चौथा दिवस:

चौथ्या दिवशीचे प्रवासाचे अंतर त्यामानाने कमी होते.  त्याचे कारण म्हणजे आम्ही दिवसाचा काही वेळ Badlands National Park या उद्यानाला, व संध्याकाळचा वेळ Mount Rushmore या राष्ट्रीय स्मारकाला देणार होतो.  Sioux Falls हून निघून Badlands  व Mount Rushmore मधे जाऊन South Dakota च्याच Rapid City या शहरात मुक्काम करणार होतो. 

South Dakota चे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे मका! कालच्या व आजच्या संपूर्ण प्रवासात मक्याची इतकी शेती दिसली की विचारता सोय नाही. अमेरिका मक्याचा सर्वात मोठा उत्पादक देश. २०व्या शतकात मक्या मुळेच हा भाग आर्थिक दृष्ट्या समृद्ध झाला. मैलोनमैल जिथे नजर जाईल तिथे मक्याची शेती होती. त्याबद्दल आम्हाला अजून माहिती मिळाली वाटेतल्या Mitchell गावात, जिथे आम्ही असेच लहरीने घुसलो, एक पाटी बघून : "World's only Corn Palace". 
मका व त्याच्या उत्पादनांची लोकप्रियता वाढविण्यासाठी २० व्या शतकाच्या सुरुवातीला बनविलेली ही इमारत. Corn Palace दिसायला सामान्यच आहे, पण लक्ष वेधून घेतात ती मक्याच्या कणसांनी बनविलेली भित्तिचित्रे.  मक्याच्या अनेकविध रंगाच्या जाती वापरून ही भित्तिचित्रं सजवतात. ही चित्रे दर वर्षीच्या कापणीच्या वेळी बदलतात, जेव्हा "मका महोत्सव" सुद्धा आयोजित केला जातो. Corn Palace च्या आत मक्याच्या विविध जाती, त्यांचे वेगवेगळे उपयोग, या शहराचा इतिहास याबद्दल बरीच माहिती मिळाली.  यानंतरचा आमचा थांबा Badlands National Park. हा भाग sedimentary rocks (गाळीव खडका) ने बनलेला असल्याने अनेक विलाक्षण दृश्ये बघायला मिळाली. भारतात चंबळच्या खोऱ्यात असलेल्या टेकाडांच्या भागासारखा दिसणारा हा प्रदेश. 
इथे अनेक प्रकारचे वन्यजीवनही आहे. त्यातील सर्वात  common म्हणजे Bison, म्हणजे रानरेडा. हा प्राणी इथेच नव्हे तर पुढे आम्ही गेलेल्या Yellowstone national park मध्ये ही सर्वत्र होता. सर्व प्राकृतिक सौंदर्याचा आनंद घेऊन आम्ही आमच्या मुक्कामाकडे, Rapid city कडे निघालो. 
पण Rapid City ला पोहोचायच्या आधी आमचे शेवटचे गंतव्य स्थान होते Mount Rushmore चे स्मारक, जिथे डोंगरातील बोडक्या खडकात अमेरिकेच्या चार प्रमुख राष्ट्राध्यक्षांचे चेहरे कोरले आहेत. २० व्या शतकाच्या सुरुवातीला बनविलेले हे स्मारक जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस जेफर्सन, टेड रुसवेल्ट आणि अब्राहम लिंकन यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ बनविले गेले. 


अमेरिकेची स्थापना, पायाभरणी, एकसंधता व विकास या एकेका पैलू कडे यातील एकेका राष्ट्राध्यक्षाने विशेष लक्ष दिले. त्यांची महती सांगणारी एक चित्रफीत ही तिथे दाखवतात. अमेरिकेत आलेल्या प्रत्येक राज्याचे नाव सामील होण्याच्या तारखेसकट इथल्या स्तंभांवर कोरले आहे.  हे सर्व बघून आम्ही Rapid City त मुक्कामासाठी पोहोचलो. 

पाचवा दिवस:

पाचव्या दिवशी आम्ही Rapid City हून निघून South Dakota व थोड्या अंतरासाठी Wyoming हि राज्ये पार करून Montana या राज्यात पोहोचलो. अमेरिकच्या उत्तरेला आणि थोडे पश्चिमेला असलेल्या या राज्यात माणसे कमी (अमेरिकेच्या मानाने देखील ) व क्षेत्रफळ खूप जास्त. मुख्यतः या राज्यात राष्ट्रीय उद्यानेच जास्त आहेत.  भौगोलिक दृष्ट्या सर्वात मोठा बदल म्हणजे South Dakota सोडता-सोडताच पूर्ण मैदानी प्रदेश संपून आजूबाजूला अधूनमधून डोंगर दिसणे सुरु झाले होते (अगदी Mount Rushmore पासूनच, जे South Dakota च्या एका टोकाला आहेत).

या भागात उन्हाळा जास्तच जाणवत होता आणि A.C. काम करत नसल्याने तापमान अजूनच त्रासदायक होत होते.   तोपर्यंत जरी तापमान ठीक असले तरी पुढे Nevada व California च्या त्रासदायक गर्मीचा धसका घेऊन आम्ही याच दिवशी वाटेत गाडीचा A.C. शक्यतो repair करण्याचे ठरविले.  सुदैवाने वाटेत Montana च्या Billings शहरात एक mechanic मिळाला ज्याने A.C. तात्पुरता rapair करून दिला आणि आमची पुढच्या प्रवासाची सोय केली… ☺  त्या दिवशी आम्ही  जवळजवळ ८०० कि. मी.  प्रवास करून Montana-Wyoming सीमेवरील Gardiner या डोंगराळ गावी पोचलो. Gardiner हे गाव प्रसिद्ध Yellowstone National Park या उद्यानाच्या सीमेवरच आहे. पुढच्या दिवशीच्या  Yellowstone भ्रमंतीची चौकशी करून आम्ही विश्रांती घेतली. त्यादिवशी hotel room मधून दिसणारे Yellowstone नदीचे दृश्य अप्रतिमच होते.


सहावा दिवस:

सहावा  दिवस हा पूर्णपणे Yellowstone फिरण्यासाठी होता. Yellowstone national park हे अमेरिकेच्या असंख्य राष्ट्रीय उद्यानांपैकी काही सर्वात मोठ्या उद्यानांमधे आहे. एवढेच नव्हे तर हे अमेरिकेतील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. याच्या लोकप्रियतेचे सर्वात मोठे कारण म्हणजे हे उद्यान एका "महाज्वालामुखी"च्या क्षेत्रात आहे. ह्या ज्वालामुखीच्या ६,४०,००० वर्षापूर्वी झालेल्या उद्रेकाने पूर्ण अमेरिका व मेक्सिको चे भूगर्भशास्त्रच बदलून टाकले आहे. हे उद्यान अनेक उष्ण पाण्याचे झरे, वन्य प्राणी ,पक्षी, मासे, साप यांच्या हजारो प्रजाती या सर्वांसाठी प्रसिद्ध आहे.

या उद्यानाची सफर आम्ही सुरु केली "Mammoth hot springs" पासून. इथल्या भूगर्भामध्ये magma (द्रवरूप खडक)
Grand Prismatic Spring
जमिनीच्या पृष्ठभागापासून खूप कमी अंतरावर असल्याने त्याच्या उष्णतेने भूजल त्वरित गरम होऊन बाहेर फेकले जाते ज्यामुळे उष्ण पाण्याचे झरे यत्रतत्र दिसतात. असेच दुसरे उदाहरण म्हणजे "Grand prismatic spring". या झऱ्यांचे  वैशिष्ट्य म्हणजे यांच्या आसपास भूजलाबरोबर बाहेर येणाऱ्या Sulphur व इतर द्रव्यांमुळे विशिष्ट प्रकारचे Micro-organisms (सूक्ष्म-सजीव) वस्ती करून राहतात ज्यामुळे लाल, पिवळा, नारंगी, हिरवा असे विविध रंगही या पाण्यात तुम्हाला दिसतात.
Yellowstone चे दुसरे आकर्षण म्हणजे इथले वन्यजीवन. ते आम्हाला इथे अगदी भरभरून दिसले. उद्यानाच्या पर्यटक केंद्राच्या बाहेरदेखील Mule deer चा कळप होता.  Bison (रानरेडे) तर अगदी  सर्वत्र.  अधून मधून हरणं, लांडगा (इथला Coyote) ह्यांचे ही दर्शन झाले. एवढेच नव्हे तर एक अस्वल ही तळ्यातून आंघोळ करून बाहेर पडताना दिसले.

पण दिवसाचा शेवट होता Yellowstone मधील Old faithful हा गरम पाण्याचा फवारा बघणे. इतर कुठल्याही उष्ण पाण्याच्या झऱ्याप्रमाणे असलेल्या या Old Faithful मधे मात्र आत निमुळती जागा तयार होते, ज्यामुळे पाणी काही काळ रोखले जाउन त्याची वाफच बाहेर फवाऱ्यासारखी फेकली जाते. दर दीड तासाने होणारा हा फवारा जवळजवळ २ मिनिटे चालतो व जवळ जवळ १०० ते १५० फूट उंच उडतो.

सातवा दिवस:

सातवा दिवस Yelllowstone पार करून, जाता जाता  जवळच्याच Grand Teton National park या उद्यानाला धावती भेट देऊन Idaho राज्यात जाण्याचा होता. पण या धावत्या भेटीतच आम्हाला अजून काही अप्रतिम सुंदर दृश्ये (Grand Teton डोंगररांगेची ) आणि अजून काही वन्यजीवन बघायला मिळाले.
 Elk या हरिणासारख्या पण घोड्याएवढ्या मोठ्या प्राण्याचेही दर्शन झले. नर Elk ची एवढी मोठी शिंगं पहिल्यांदाच बघितली. आदल्या दिवशीप्रमाणेच खूप रानरेडे ही दिसले.

निसर्गसौंदर्याने गच्च भरलेल्या या प्रदेशात वेळ असेल तर आठवडा देखील कमी पडेल. पण वेळेअभावी शेवटी या सुंदर जागेचा निरोप घेऊन आम्ही Idaho राज्याकडे कूच केले. Yellowstone व Grand Teton चा बराचसा भाग Wyoming राज्यात आहे. तो मागे सोडून एक खिंड पार करून आम्ही पुन्हा एकदा मैदानी प्रदेशात Idaho मध्ये प्रवेश केला. एकूण सुमारे ५०० कि. मी. प्रवास करून आम्ही Pocatello नावाच्या गावात मुक्कामाला पोहोचलो .
Elk


आठवा दिवस:

आजचा आठवा आणि शेवटचा दिवस आम्ही Idaho, Nevada व California या राज्यांमधून प्रवास करणार होतो. आजच्या प्रवासात तसे Touristic ठिकाण काही आमच्या plan मध्ये नव्हते. मधे कुठे Detour घ्यावासा वाटेल तिथे भटकूया असे ठरवून Pocatello हून निघालो. Idaho हे राज्य बटाट्यासाठी प्रसिद्ध आहे.  South Dakota मधे जशी मक्याची शेती तशी इथे बटाट्याची शेतं दिसत होती. त्यामुळेच Idaho la कधीकधी "Potato State" असेही संबोधले जाते.

बाकी काही plan नसल्याने असाच लहरी detour घेऊन आम्ही Idaho च्या Twin Falls शहराजवळ पोचलो. नावाप्रमाणेच हे शहर धबधब्यासाठी प्रसिद्ध आहे.  इथल्या Shoshone Falls ला Niagara of the west असे संबोधले जाते. या Shoshone Falls ला भेट देऊन आम्ही तिथल्या सृष्टी सौंदर्याचा आस्वाद घेतला. उन्हाळ्यामुळे पाणी जरी कमी असले तरी त्याच्या विशाल आकाराची कल्पना तरी नक्कीच  आली.

यानंतर मात्र आमच्या प्रवासातील बाकीचे अंतरात गाडीतूनच बाहेरचे दृश्य बघितले. त्याचे कारण गाठायचा पल्ला ही मोठा होता, व मधल्या नेवाडा राज्यात अफाट मोकळ्या जमिनीपेक्षा अक्षरशः काहीही दिसत नाही. अशाच वेळी देशाच्या त्या "पसाऱ्या"चा आणखी चांगला अनुभव येतो. नेवाडा पार करून आम्ही California राज्यात प्रवेश केला तो पुन्हा Sierra Nevada डोंगररांगेतून.  आमचे शेवटचे गंतव्य स्थान फोल्सम इथून फार लांब नव्हते व संध्याकाळी ८. ३० च्या सुमारास जवळ जवळ ११०० कि.मी. अंतर पार करून आम्ही आमचा प्रवास संपविला.

या आठ दिवसात अमेरिकेच्या विविध भौगोलिक प्रदेशांची, हवामानाची, खाण्याची, संस्कृतीची, राहणीमानाची, वन्यजीवनाची वेगळ्या प्रकारे ओळख झाली. आधी म्हणल्याप्रमाणे देशाच्या पसाऱ्याचा अंदाज आला. भारतात जम्मू तवी ते कन्याकुमारी (हिमसागर एक्स्प्रेस) हा प्रवास मला कितीतरी दिवस करायचा असूनदेखील संधी मिळाली नव्हती. तो प्रवास कसा असेल याची कल्पना मला या प्रवासाने आली. यापुढे अशा प्रकारच्या कुठल्याही प्रवासाची संधी (भारतात किंवा बाहेरही) मिळाली तर मी एका पायावर तयार असीन! 


- मिहीर