परवा एका मित्राशी बोलताना विषय निघाला होता, की आपल्या ज्ञानेंद्रियांमधे डोळ्यांचे महत्त्व किती अनन्यसाधारण आहे... डोळॆ नसतील तर आपले सर्व अनुभव किती मोकळे, पोकळ वाटतील...
मग माझ्या डोक्यात विचाराचा किडा फ़िरू लागला -`खरंच असे आहे का ?' . . . कान . . . काही विशिष्ट आवाज सोडले तर त्यातून आपल्याला ढिगानी अशी माहिती मिळत नाही. . . जीभ . . . आपण काही जे मिळेल ते चाखून बघायला जात नाही . . . त्यामुळे एखादा फ़लंदाज मैदानात यायच्या आधीच जखमी व्हावा तसे जीभ आधीच बाद ! त्वचा . . . हो, तसं म्हणलं तर आजूबाजूच्या वातावरणाची - गरम, थंड, वारा, पाऊस, पाणी, गर्दी या सर्वाची माहिती तर मिळते . . . पण जात्याच त्वचेचा टप्पा फ़क्त अगदी लगतच्या गोष्टींपर्यंत असतो . . . त्यामुळे तीही तशी कमकुवतच !
मग मात्र माझी गाडी आली वासावर . . . नेहमीच्या आयुष्यात वासांना बरंच महत्त्व असतं. आपले अनेक चांगले-वाईट अनुभव वासावरच अवलंबून असतात . . .
चुकुन मासळी-बाजाराजवळून जायची वेळ आली, तर त्यावेळी नाकातले केस जळून तर गेले नाहीत ना अशी शंका येते...नासलेल्या नारळाचा, रेल्वे स्थानकावरच्या स्वच्हतागृहाच्या बाहेरचा, जळक्या प्लास्टिकचा, कुठे ट्रेकला गेले असता तिथे कुणीतरी अनवधानाने कापलेल्या `केक' चा . . हे सर्व वास न विसरता येण्याइतके असह्य असतात . . . आपण दिवसभर उंडारुन घरी यावं आणि बूट काढल्यानंतर आपले मोजे बाहेर येताच, मोठ्या भावाने आपल्याला शिव्यांची लाखोली वाहावी, हे बहुतांना काही नवीन नाही . . .
हे वाईट वास जसे त्या अनुभवांचा अविभाज्य घटक होतात, तसेच चांगले वास ही आपला ठसा उमटवून जातात. फ़ेसाळत्या कॉफ़ीचा वास, पहिल्या पावसाच्या वेळी मातीचा वास, खरपूस भाजलेल्या ब्रेडचा वास, कढवलेल्या तुपाचा वास, रातराणीचा मंद सुगंध, गरम वडापावचा वास... हे सर्वच त्या-त्या अनुभवाला जिवंत करतात...
पण चांगले व वाईट अशी वासांची साधी विभागणी होत नाही.. काही वास नुसतेच विचित्र, एकमेवाद्वितिय असतात . . .दुधाच्या डेअरीत गेल्यानंतर येणारा वास, मसाले किंवा कांडप केंद्राजवळ येणारा वास, चित्रपटगृहात मध्यंतरात बाहेर पडले की येणारा पॉपकॉर्न, कॉफ़ी इत्यादीचा संमिश्र वास हे सर्व त्यात मोडतात. कुठ्ल्याही सरकारी कार्यालयात गेले, की तिथल्या फ़ायली, कागद, जुनी स्टेशनरी, या सर्वांचा मिळून एक एकत्रित वास असतो . . नवीन वह्या-पुस्तकं घेतली की त्यांच्या पानांना येणारा वास तर सर्वपरिचित आहेच...काही फ़र्निचरच्या दुकानांच्या जवळून गेले की तिथल्या लाकूड, फ़्रेम्स, वॉर्निश या सर्वांचा एक विचित्र वास येत असतो..
ह्या सर्वांवरून माझे तर मत असेच पडले की जरी , तरी घ्राणेंद्रियेही आपल्या अनुभवात मोलाची भर घालत असतात . त्यामुळे त्यांच्याकडे काणाडोळा (की वाकडे नाक? :D) करून चालणार नाही . . .
No comments:
Post a Comment